विटा : मैत्रीचा गैरफायदा घेत जवळीक साधून फोटो काढले आणि ते समाज माध्यमांवर प्रसारित करण्याची धमकी देऊन चार महिने एका तरुणीवर अत्याचार केल्याची घटना शनिवारी उघडकीस आली आहे. या प्रकरणी संबंधित संशयित आरोपी जाहिद लियाकत शिकलगार (वय २५, रा. साळशिंगे रोड, विटा) यास विटा पोलिसांनी अटक केली आहे. या बाबत संबंधित पीडित तरुणीने पोलिसांत फिर्याद दिली आहे.
याबाबत विटा पोलिसांनी सांगितले की, संशयिताने संबंधित तरुणीबरोबर मैत्रीचे नाते निर्माण केले. त्यानंतर तिच्याशी जवळीक साधून फोटो काढले आणि ते समाज माध्यमातून प्रसारित करण्याची धमकी त्याने दिली. तसेच ऑगस्ट ते दि. २९ डिसेंबर २०२२ पर्यंत वेळोवेळी लॉजवर नेऊन इच्छेविरुद्ध जबरदस्ती केली. त्यास विरोध करण्याचा प्रयत्न करताच, त्याने स्वतःच्या हातावर ब्लेड मारून, विषारी औषध, गोळ्या खाल्याचे भासवून आत्महत्या करण्याची धमकी दिली. तसेच शिव्या देऊन मारहाण करून वेळोवेळी अत्याचार केला. या प्रकरणी संबंधित पीडित तरुणीने दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी तरुण जाहिद लियाकत शिकलगार यांस विटा पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याविरुद्ध विटा पोलिसांत भारतीय दंड विधान कलम ३७६, ३७६ (३), ३५४, ३५४ (ड), ३२३, ५०४, ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
दरम्यान हा प्रकार लव्ह जिहाद व जबरदस्तीने धर्मांतराचा असल्याचा संशय हिंदुत्ववादी संघटनांच्या प्रतिनिधींनी व्यक्त केला असून त्यादृष्टीने तपास व्हावा अशी मागणी केली आहे. या विषयी भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सचिव व हिंदू एकता आंदोलन जिल्हा अध्यक्ष श्री. विक्रम पावसकर, आमदार श्री. गोपीचंद पडळकर , श्री. जगन्नाथ पाटील, श्री. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे विटा विभाग प्रमुख श्री. महेंद्र माने तसेच विटा शहरातील समस्त हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. संतोष डोके यांची भेट घेतली.
हिंदुत्ववाद्यांचा मोर्चा
या घटनेमुळे खानापूर तालुक्यातील हिंदू धर्मियांमध्ये संतापाचे वातावरण असून लव्ह जिहाद, धर्मांतर व गोहत्त्या विरोधात कायद्याच्या मागणीसाठी मोर्चाचेही नियोजन करण्यात आले आहे. मंगळवार, दि. २४ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता नाथ मंदिर येथून हिंदू गर्जना मोर्चा काढण्यात येणार आहे. या संबंधी समाज माध्यमातून प्रसार सुरु आहे.
0 टिप्पण्या