विटा : खानापूर तालुक्यातील सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या गार्डी शाखेत शाखाधिकारी रघुनाथ धोंडीराम यादव आणि सेवानिवृत्त कर्मचारी धनराज रामचंद्र निकम या दोघांनी संगणमताने शेतकऱ्यांना मिळालेले शासकीय अनुदान आणि व्याजाच्या रकमेत सुमारे 30 लाखांची मोठी अफरातफर केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. दोन वर्षांपूर्वी निकम हा शाखाधिकारी असताना रघुनाथ यादव हा कर्मचारी म्हणून कार्यरत होता. या काळात दोघांनी मिळून शेतकऱ्यांच्या खात्यावरील सुमारे 30 लाखांच्या रकमेचा अपहार केल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणाच्या चौकशीनंतर शाखाधिकारी रघुनाथ यादव याला तातडीने निलंबित करण्यात आले असून या दोघांची वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत चौकशी सुरू करण्यात येणार आहे. तर लवकरच या दोघांवर फौजदारी गुन्हे देखील दाखल करण्यात येणार असल्याची माहिती बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव वाघ यांनी दिली आहे. परंतु आमदार सुहास बाबर आणि जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक अमोल बाबर यांच्या गावात अशा पद्धतीने महाघोटाळा करण्याचे धाडस करणाऱ्या या अधिकाऱ्यां विरोधात आमदार सुहास बाबर आणि अमोल बाबर यांनी देखील कठोर कारवाई केली पाहिजे अशी मागणी होत आहे.
एकूणच शेतकऱ्यांच्या खात्यावरील पैशांची बँक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी अफरातफर केल्यामुळे परिसरातून संताप व्यक्त होत असून या महाघोटाळ्यामुळे तालुक्यात मात्र मोठी खळबळ उडाली आहे.
0 टिप्पण्या