महायुतीचे उमेदवार सुहास बाबर यांचा उमेदवारी अर्ज दाखल
![]() |
विटा : निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. विक्रम बांदल यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल करताना सुहास बाबर, मंत्री शंभूराज देसाई आदी. |
विटा : खानापूर - विधानसभा मतदारसंघ निवडणूकीसाठी महायुती शिंदे गटाचे अधिकृत उमेदवार सुहास अनिलराव बाबर यांनी आज राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांच्या उपस्थितीत साधेपणाने निवडक कार्यकर्त्यांसमवेत उमेदवारी अर्ज दाखल केला. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला त्यांनी अभिवादन केले. अर्ज दाखल केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना मंत्री देसाई म्हणाले, आमदार दिवंगत अनिल बाबर यांचे व आमचे कौटुंबिक संबंध होते. अनिलभाऊंचा वैचारिक, कामाचा, कष्ट करायचा, मतदारसंघातील सामान्य जनतेला दिलेला शब्द पुर्ण करण्याचा वारसा सुहास बाबर पुढे चालवतील. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुहास बाबर यांच्यावर विशेष लक्ष आहे. त्यामुळे पक्षाची, महायुतीची पुर्ण ताकद सुहास यांच्या पाठीमागे उभा केलेली आहे. सांगली जिल्ह्यात नव्हे तर पश्चिम महाराष्ट्रात सर्वात जास्त मताधिक्याने निवडून येणारा उमेदवार सुहास असेल.
सुहास बाबर म्हणाले, शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, आरपीआय या महायुतीतर्फे मी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. गेल्या दहा वर्षात दिवंगत आमदार अनिलभाऊंची जी विकासाची गती होती. तीच विकासाची गती राखण्याची जबाबदारी आमच्या सर्वांची आहे. निवडणूक आपण कुणाचा तरी पराभव करायचा या हेतूने लढविणार नाही. ज्यापध्दतीने अनिलभाऊंनी विकास केला आहे. त्या विकासाची भूमिका येथून पुढे कायमस्वरूपी सातत्य ठेवून ही निवडणूक लढतोय. पक्षाच्या व आमच्या पाठीमागे लोक ताकदीने उभा राहतील असा मला आत्मविश्वास आहे. मोठ्या फरकाने माझा विजय निश्चित होईल.
यावेळी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक तानाजी पाटील, सुनील पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य सुहास शिंदे, राजाभाऊ शिंदे, अनिल म. बाबर, विनोद गुळवणी यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
0 टिप्पण्या