या गाडीशी माझा कोणताही संबंध नाही : शहाजी पाटील

 


मी रोकड जप्त झाल्याची बातमी टीव्हीला पाहिली. माझे नाव यात कुठेही आलेले नाही. या गाडीशी माझा कोणताही संबंध नाही. त्या तालुक्यात माझे हजारो कार्यकर्ते आहेत. पण ती गाडी कोणाची याबद्दल मला काहीही कल्पना नाही, असे शिवसेना आमदार शहाजी पाटील यांनी म्हटले आहे.

दरम्यान शहाजी पाटील पुढे बोलताना म्हणाले की, मी काल दिवसभर खेड्यापाड्यात फिरत होतो. मला रात्री 10 वाजता ही बातमी समजली. संजय राऊतांची सत्ता गेल्यापासून त्यांना झोपताना झाडं आणि उठताना डोंगर दिसत आहेत. सांगोला म्हटल्यानंतर त्यांचा डोळ्यासमोर फक्त माझा चेहरा दिसतो. मला याबद्दल कोणतीही माहिती नाही, याप्रकरणाशी माझा कोणताही संबंध नाही.

माझं नाव यात कुठेही नाही

शहाजी पाटील म्हणाले की, मी रोकड जप्त झाल्याची बातमी टीव्हीला पाहिली. माझं यात कुठेही नाव आलेलं नाही. या गाडीशी माझा कोणताही संबंध नाही. तर अमोल नलावडे हे शेकापचा कार्यकर्ते आहेत. त्याचे वडील शेतकरी कामगार पक्षाचे पदाधिकारी होते. गेल्या दोन वर्षांपासून तो माझ्यासोबत शिवसेनेचे काम करत आहे. त्यांचे अनेक व्यवसाय आहेत. त्यात काय हे मला माहिती नाही.

संजय राऊतांचे ट्विट काय?

ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी म्हटलंय की, मिंधे टोळीतील एका आमदाराच्या गाडीत खेड शिवापूर टोल नाक्यावर 15 कोटी सापडले ! हे आमदार कोण?, काय झाडी... काय डोंगर.... मिंधे यांनी निवडणुकीसाठी प्रत्येक उमेदवारास 75 कोटी पाठवले 15 कोटी चा हा पहिला हप्ता ! काय बापू.. किती हे खोके? असा सवाल उपस्थित करत अप्रत्यक्ष शहाजी पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे.

सांगोल्याहून कोल्हापूरकडे जाणाऱ्या गाडीतून पुण्यात 5 कोटी रुपये जप्त

कोल्हापूरच्या दिशेने भरधाव निघालेल्या सांगोला (जि. सोलापूर) येथील एका गाडीतून पुण्यातील खेड-शिवापूर टोलनाक्यावर सुमारे 5 कोटी रुपयांची रोख रक्कम असलेली गाडी पोलिसांनी ताब्यात घेतली. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाकेबंदीदरम्यान ही रक्कम ताब्यात घेतली आहे. याप्रकरणी 3 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी सांगली जिल्ह्यात आटपाटी तालुक्यात एका ओढ्यात सुमारे 80 लाख रुपयांची रक्कम पोलिसांना सापडली होती.


नलावडे नामक व्यक्तीच्या नावे नोंदणी

संबंधित गाडी ही सांगोला येथील एका नलावडे नावाच्या व्यक्तीवर असल्याची माहिती मिळाली आहे. सांगोला या ठिकाणी एका नेत्याची ही रक्कम असल्याचे पोलिसांना समजले असून त्या दृष्टीने खातरजमा करण्यात येत आहे. ही रक्कम नेमकी किती आहे हे समजण्यासाठी याबाबत पोलिसांनी नोटा मोजण्यास सुरुवात केली आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या