विटा : खानापूर मतदारसंघात शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा दणका देत माजी आमदार अॅड. सदाशिवराव पाटील व त्यांचे सुपुत्र विट्याचे माजी नगराध्यक्ष अॅड. वैभव पाटील यांच्यासह कार्यकर्त्यांचा आज मंगळवारी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, शिराळा विधानसभा मतदारसंघाचे आमदार सत्यजित देशमुख, सांगली जिल्हा अध्यक्ष सम्राट महाडिक यांच्या उपस्थितीत हा प्रवेश झाला.
यावेळी वैभव पाटील यांनी भाजपच्या राष्ट्रीय विचारधारेशी जोडताना मतदारसंघाच्या विकासाच्या दिशेने एक निर्णायक पाऊल उचलले आहे. माझ्या या प्रवासात मला मार्गदर्शन करणाऱ्या पक्ष नेतृत्वाचे, आणि नेहमी माझ्यावर प्रेम करणाऱ्या जनतेचे, माझ्या सोबत असलेल्या हजारो कार्यकर्त्यांचे, हितचिंतकांचे, ज्येष्ठांचे आभार मानले. आता भाजपच्या माध्यमातून जनतेच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी यापुढेही प्रत्येक क्षण झोकून देईन. आपल्या साथीने हे परिवर्तन अधिक सक्षम, अधिक व्यापक होईल यावर माझा पूर्ण विश्वास असल्याचेही त्यांनी बोलून दाखवले.
विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर माजी आमदार सदाशिवराव पाटील, वैभव पाटील समर्थक कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीत सहभागी होण्याची इच्छा नेत्यांकडे व्यक्त केली. गेल्या दोन दिवसांपूर्वी विट्यात झालेल्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या मेळाव्यातही कार्यकर्त्यांनी नेत्यांवर दबाव आणून भाजप प्रवेशाचा आग्रह केला होता.
विटा नगरपालिकेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आल्याने सत्ताधारी पक्षात सहभागी होणे गरजेचे असल्याचे मत नेत्यांनीही व्यक्त केले. या पार्श्वभूमीवर माजी आमदार अॅड. सदाशिवराव पाटील, वैभव पाटील यांनी भाजपात जाण्याचा अंतिम निर्णय घेतला.
त्यामुळे आज मंगळवारी सकाळी ११ वाजता मुंबईतील भारतीय जनता पार्टीच्या पक्ष कार्यालयात सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्यासह मंत्र्यांच्या उपस्थितीत वैभव पाटील यांच्यासह हजारो कार्यकर्त्यांचा भाजप प्रवेश झाला.
0 टिप्पण्या