![]() |
नवागत विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व फुल झाडे वाटप करतांना तळेवस्ती शाळेच्या मुख्याध्यापिका स्नेहा सूर्यवंशी (कुकडे) व उपस्थित पालक |
वायफळे (राजेश पाटील) : उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर शाळेची आज घंटा वाजली. चिमुकल्यांनी पहिल्याच दिवशी शाळेची पायरी चढली. पहिल्या दिवशी येथील जिल्हा परिषदेच्या तळेवस्ती शाळेत नवागतांचे पुस्तके व गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. त्यामुळे विद्यार्थ्यांतून आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते.
जिल्हा परिषद शाळा तळेवस्ती वायफळे येथील क्रमांक एक ते चार च्या नवागत विद्यार्थ्यांचे शाळेतील मुख्याध्यापक -शिक्षिका सौ. स्नेहा सूर्यवंशी(कुकडे )यांनी उन्हाळी सुट्टीत बनवलेल्या कागदी फुले व कागदी टोप्या घालून मोठ्या उत्साहात या विद्यार्थ्यांचे स्वागत केले,प्रत्येक विद्यार्थ्यांच्या नावे एक फुल झाड भेट म्हणून हातात दिल्यावर या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत होता.
शाळेच्या पहिल्या दिवशी नवे शालेय साहित्य, नवा गणवेश, नवे सवंगडी, अशा प्रसन्न उत्साही वातावरणात आज शाळेचा पहिला दिवस उत्साहात पार पडला. नवीन वर्गात विद्यार्थ्यांना नेऊन सोडण्यासाठी पालकांची लगबग सुरू होती. पहिल्या दिवशी नवीन वर्गात प्रवेश करताना नवीन व जुन्या पुढच्या वर्गात दाखल झालेल्या वविद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळेच कुतूहल व उत्साह जाणवत होता. वर्गात प्रवेश करून पहिल्या बेंचवर बसण्यासाठी या चिमुकल्यांची धडपड लक्ष वेधून घेत होती. सकाळी साडेदहा वाजता प्रार्थना घेण्यात आली.शासनाकडून आलेल्या पहिली ते चौथीच्या पुस्तकांचे संच व गुलाब पुष्प देऊन विद्यार्थ्यांचे पालकांच्या हस्ते व मुख्याध्यापक शिक्षिका सौ.स्नेहा सूर्यवंशी(कुकडे) यांचे हस्ते स्वागत करण्यात आले.
सकाळी 11 वाजता वर्ग सुरू झाले. विद्यार्थ्यांनी शाळेच्या पायऱ्यांचे दर्शन घेऊन आज प्रवेश केला. जुने -नवे सवंगडी भेटल्यानंतर एकमेकांना शुभेच्छा देत आनंदोत्सव साजरा करून नवीन वर्ष सुरू झाल्याने शाळेत आनंदाचे व प्रसन्न वातावरण होते.
प्रारंभी मुख्याध्यापिका स्नेहा सूर्यवंशी( कुकडे ),यांनी उपस्थित सर्वांचे स्वागत केले. यावेळी पालकांच्या हस्ते सरस्वती पूजन करण्यात आले. तद्नंतर पुस्तक संच व गणवेश वाटप वाटण्यात आले.यावेळी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष शामराव नलवडे, पालक सागर पाटील,दत्तात्रय नलवडे,अमोल सूर्यवंशी ,अंगणवाडी सेविका राजाक्का पाटील, आशा स्वयंसेविका जयश्री पाटील,पालक पूजा पाटील ,स्वाती नलवडे
विद्यार्थी व पालक उपस्थित होते.या कार्यक्रमास उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांसाठी स्नेहभोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.
0 टिप्पण्या