मुंबई : विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजताच महायुतीत नाराजीचे सत्र सुरू झाल्याचे दिसत आहे. राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर हे महायुतीतून बाहेर पडणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे आता राष्ट्रीय समाज पक्ष राज्यात स्वबळावर निवडणूक लढवणार आहे.
गेल्या काही दिवसांपासून महादेव जानकर हे महायुतीमध्ये नाराज होते. विधानसभेसाठी महादेव जनकर यांनी महायुतीकडे 40 ते 50 जागांची मागणी केली होती. पण त्यांना अपेक्षित प्रतिसाद मिळत नव्हता. त्यामुळेच त्यांनी आता महायुतीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. महादेव जानकर यांचा राष्ट्रीय समाज पक्ष आता राज्यात सर्व जागा स्वबळावर लढणार आहेत.
महादेव जानकर यांनी महायुतीच्या माध्यमातून लोकसभा निवडणूक लढवली होती. मात्र परभणीत त्यांचा पराभव झाला. त्यानंतर जानकर आपल्या पक्षाला विधानसभेत सन्मानजनक जागा मिळवून देण्यासाठी जोरदार प्रयत्न करत होते. मात्र अपेक्षित जागा मिळणार नसल्याचे लक्षात येताच त्यांनी महायुतीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे.
महायुतीला मोठा धक्का
महायुतीतून बाहेर पडल्यावर आता महादेव जानकर यांचा पक्ष राज्यात किती जागा लढवणार हे पाहावे लागेल. मात्र महादेव जानकर यांच्या या निर्णयामुळे महायुतीला मोठा धक्का बसल्याचे बोलले जात आहे. आता जानकर यांची नाराजी भाजप आणि महायुती दूर करणार का, हे पाहावे लागेल.
महायुतीतून बाहेर पडल्यानंतर महादेव जानकर यांनी प्रतिक्रिया दिली. महायुती किंवा महाविकास आघाडीने आपला संपर्क साधला नसून पक्ष वाढीसाठी हा निर्णय घेतल्याचे ते म्हणाले. महाराष्ट्रात 288 जागा लढवण्याची तयारी असल्याचे जानकर म्हणाले.
0 टिप्पण्या