टेंभूसाठी पंधराशे कोटींची तरतूद केली जाईल : राधाकृष्ण विखे पाटील

सांगली दि. ११ : आज सांगली येथे राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सांगली जिल्ह्याच्या जलसंपदा विभागाची आढावा बैठक पार पडली. 

टेंभू योजनेचा सहावा टप्पा आगामी दोन वर्षात पूर्ण करणार असून त्यासाठी लागणारी १५०० कोटींची तरतूद केली जाईल अशी ग्वाही राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.  

आमदार सुहास बाबर यांनी टेंभूच्या प्रलंबित प्रश्नांवर मंत्री महोदयांचं लक्ष वेधलं असता त्यांनी टेंभूच्या उर्वरित कामासाठी सकारात्मक असल्याचं स्पष्ट केलं.

त्याचबरोबर कालच भाजपा पक्षात प्रवेश केलेल्या वैभव पाटील यांनीही महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांची सांगली जिल्हा दौऱ्यावर असताना दौऱ्यात भेट घेऊन मतदारसंघाच्या दृष्टीने महत्त्वाच्या टेंभू योजनेच्या सहाव्या टप्प्याच्या कामकाजाबाबत आढावा बैठकीचे आयोजन करण्याचे व सांगली जिल्ह्यातील विविध पाणी योजनांच्या माध्यमातून दुष्काळी भागांना पाणीपुरवठा करण्याची मागणी केली.

या मागण्यांवर मंत्रिमहोदयांनी सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच आवश्यक उपाययोजना करण्याचे आश्वासन दिल्याचे वैभव पाटील यांनी सांगितले.

त्याचबरोबर आमदार सुहास बाबर यांनी माहिती देताना, आज सांगली येथे राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सांगली जिल्ह्याच्या जलसंपदा विभागाचा आढावा घेण्यात आला. टेंभू बाबत मंत्री महोदयांच्या निदर्शनास खालील बाबी आणून दिल्या. जलसंपदा मंत्री यांनी सकारात्मकता दाखवून टेंभू योजनेस आगामी दोन वर्षात सहावा टप्पा पूर्ण करण्याची ग्वाही दिली.

यासाठी लागणारी पंधराशे कोटींची तरतूद केली जाईल असे सांगितले. तसेच टेंभू योजनेचे पंप 20 ते 25 वर्षांपूर्वी खरेदी केले असल्याने ते टप्प्याटप्प्याने पंप बदलण्यात येणार. देवीखिंडी बोगदा सक्षमीकरण करण्याच्या सूचना ही अधिकाऱ्यांना दिल्या. टेंभू योजनेचे पंपग्रह क्रमांक एक ते पाच पर्यंतच्या सर्व पंपग्रहाच्या ठिकाणी अतिरिक्त रोहित्र बसविण्यात यावे या सूचना दिल्या जेणेकरून पंप विजे विना पंप हाऊस बंद होणार नाही याची काळजी घेण्याची सूचना दिली. राजेवाडी तलावाचे व्यवस्थापन सांगली मंडळ कार्यालयाकडे देण्याच्या सूचना यावेळी दिल्या. खानापूर आटपाडी तालुक्यातील साठवण तलावाच्या खालील वंचित क्षेत्र कॅनल ऐवजी पाईपलाईन (पीडीएन) करण्याच्या तसेच संबंधित प्रस्ताव सादर करण्याचे विभागाला आदेश दिले.

या सर्व बाबींचा आढावा घेण्यासाठी टेंभू योजनेची आढावा बैठक मंत्रालय स्तरावर पुढील दिवसात घेण्यात येईल असे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या